मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी अखेर पार पडला. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला सहा व शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रिपदे तर पाच जणांना राज्यमंत्रीपद देण्यात आले असून, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार अतुल सावे यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून भाजपला आतापर्यंत मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. अखेर सावे यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले आहे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवनावर नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज सकाळी पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेचे प्रमुख नेते गैरहजर होते. शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद नाकारल्यामुळे त्यांना दोन कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन कमळ हाती घेणारे विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई महापालिका व लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळवून देण्यास हातभार लावणारे आशीष शेलार आणि काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केलेले बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी सर्वात आधी शपथ घेतली. भाजपचे जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे, मोर्शी (जि. अमरावती) चे आमदार डॉ. अनिल बोंडे, मिरजचे आ. सुरेश दगडू खाडे व डॉ. अशोक उईके तसेच शिवसेनेचे विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांनी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर भाजपचे अतुल सावे, संजय भेगडे, परिणय फुके, योगेश सागर आणि रिपाइं (आठवले गट) चे अविनाश महातेकर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
उद्यापासून (सोमवार) राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला. चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या असून, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारच्या या अखेरच्या मंत्रिमंडळ विस्तारात 13 नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली आहे. मराठवाड्यातून जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत, अतुल सावे तर विदर्भातून अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, प्रा. डॉ. अशोक उईके यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे विश्वासू परिणय फुके यांची वर्णी लागली आहे. राजभवनावर पार पडलेल्या विशेष सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
मेहता, पोटे, बडोले, सवरा, कांबळे, अत्राम यांना डच्चू
मुंबईतील एम.पी. मिल कंपाऊंड गृहनिर्माण प्रकल्पात लोकायुक्तांनी ठपका ठेवल्याने अडचणीत आलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रिपद गमवावे लागले आहे. याशिवाय आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरिश अत्राम, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. हे सर्व मंत्री भाजपचे आहेत. या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते स्वीकारले आहेत.











